साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास, त्यात तळपणारा उन, शरीराची लाहलाह आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून भाविक – भक्त आणवाणी पावलांनी सप्तशृंगगडावर पोहोचले. उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्र यात्रे दरम्यान खान्देश प्रांतातून आई साहेबांच्या माहेरची भेट घेऊन आलेले लाखोच्या संख्येने भाविक – भक्तांच्या उपस्थितीत आज दुपारी ४.०० वा. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपारीक पद्धतीने किर्तीध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वर्धन पी. देसाई - जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश, नाशिक, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी अॅड. श्री. ललित निकम, सौ. मनज्योत पाटील, डॉ. श्री. प्रशांत देवरे, श्री. भूषणराज तळेकर, ध्वजाचे मानकरी दरेगाव येथील श्री गवळी कुटुंबीय व पोलीस पाटील श्री. शशिकांत बेनके आदी कुटुंबियांच्या हस्ते किर्ती ध्वजाची विधिवत पूजा – अर्चा होऊन देवस्थानच्या मुख्यकार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता. शुक्रवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा किर्तिध्वज फडकला. या किर्तीध्वजाचे दर्शन शनिवारी पहाटे पासून भाविकांना घेता येणार आहे.
समुद्र सपाटीपासून ४६०० फुट उंच असलेल्या सप्तशृंगगडावरील दरेगावचे पाटील (गवळी) बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही, झाडे - झुडपे नाही, खाच - खळगे नाहीत मग पाटील (गवळी) शिखरावरती जातात तरी कसे असा प्रश्न भाविक- भक्तामध्ये चर्चित होता, हा चमत्कारीक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक - भक्त सप्तशृंगगडावर उपस्थित असतात. मातेच्या शिखरावर किर्ती ध्वज फडकविण्याची परंपरा गवळी कुटुंबीय शिखरावरती जाऊन ध्वजारोहन करण्याची परंपरा आहे. नवरात्र उत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी (चावदस) च्या मध्यरात्री निशाण लावतात. ध्वजासाठी ११ मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते तसेच जातांना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू दिल्या जातात. दुपारी ४.०० वा. सुमारास संपूर्ण गावातून किर्ती ध्वजाची मिरवणूक निघून लाखो भाविक - भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. सायंकाळी ७.३० वा. देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवती समोर नतमस्तक होवून शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्याजागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करतात. शिखरावर ध्वज फडकल्यानंतर भाविक – भक्त झेंड्याचे दर्शन घेवून परतीच्या मार्गाला लागलेत. प्रसंगी नाशिक येथील देणगीदार भाविक श्री. भरत चोप्रा यांनी श्री भगवतीच्या चरणी रक्कम रु. ११,११,१११/- श्री भगवती मंदिर जिर्णोद्धार करीता देणगी अर्पण केली. विश्वस्त संस्थे मार्फत त्यांचा श्री भगवती प्रतिमा, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
ह्या विधिवत किर्ती ध्वजाच्या सोहळ्या प्रसंगी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक श्री. समाधान नागरे, पोलीस उप निरीक्षक श्री. निकम, ट्रस्ट व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे, प्रकाश पगार, गोविंद निकम, नारद अहिरे, शाम पवार, किरण राजपूत, प्रशांत निकम, जगतराव मुंदलकर, यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत विश्वस्त संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, ग्रामस्थ, भाविक – भक्त व शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी ससंस्थेतील सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….