ता. १३ साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडाचे पावित्र्य राखणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, सप्तशृंगगडावर प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी व गड प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी बाह्यस्थ संस्थेमार्फत गडावरील सर्व कामांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.सप्तशृंगगडावर गुरुवारी (ता. १३) सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक, रोप वे व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या सप्तशृंगीगडाचे पावित्र्य राखणे, पर्यावरणाचे संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट व रोप-वे व्यवस्थान यांनी एकत्रितपणे गडावरील सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक व्यवस्थापन कामात सहभागी होऊन काम करावे असे आवाहनही त्यांनी दिले. गड परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांना चर्चा व मते जाणून घेतली. गडावर रोज निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी महिला बचतगटाच्या मदतीने कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक, संचालक अँड. दीपक पाटोदकर, रोप-वेचे राजीव लुंभा, सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, दीपक चाटे, आनंद पिंगळे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, ग्रामसेवक संजय देवरे आदी उपस्थित होते. नियमांचा सोयीनुसार वापर कोरोना ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शासकीय बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे सप्तशृंगी गडावर ऑफलाइन पद्धतीने सांडपाणी, प्लॅस्टिक व्यवस्थापन बैठक झाली. त्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद प्रशासन विशेष समित्यांच्या सभा शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन पद्धतीने घेत आहे. तर दुसरीकडे ऑफलाइन पद्धतीने बैठक घेऊन प्रशासन सोयीनुसार नियम वापरत असल्याचेही सदस्यांनी बोलून दाखविले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....