सप्तशृंगगड | श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा म्हणून नातवंडांनी केले दान...!

0
सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती आजोबा म्हणजे नातवंडांचे हक्काचे व्यासपीठ असते. आजी शिवाय संस्कार नाही, अन आजोबांशिवाय संघर्ष नाही असं म्हटलं जातं. अन या दोन्हीही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे ही बाब नातवंडांसाठी फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती आजी असो किंवा आजोबा. या दोन्हीही व्यक्तींशी असलेली जवळीक, त्यांचे प्रेम काही केल्या विसरता येत नाही. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटे, शब्दांतून मार्ग मोकळा करुन दिला जातो. आयुष्याच्या वळणावर आपल्यापासून कायमचे दुरावलेल्या आजी आजोबांच्या आठवणी नाशिक येथील निकम परिवाराने अनोख्या पद्धतीने स्मृती पटलावर उभ्या केल्या. आपल्या मातोश्रीच्या आई वडिलांच्या अर्थात आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्मृती जागवत एक उत्तम उदाहरण निकम कुटुंबातील सदस्यांनी समाजासमोर उभे केले आहे. अलीकडच्या जगात शब्दांतून भावना व्यक्त करणारे भरपूर असतील परंतु आपल्या आजी आजोबांच्या स्मृती जागवण्यासाठी नातवंडांनी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टला एकूण ५ लाख १०१ रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे. 
         मूळचे आराई (ता.  सटाणा) येथील परंतु नाशिक स्थित असलेल्या शकुंतला एकनाथ निकम यांच्या लेकरांनी आपल्या आजोळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या आजोबा व आजीच्या स्मरणार्थ विश्वस्त संस्थेला दान देत एक अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. स्वर्गीय मोतीराम बजन बच्छाव व स्वर्गीय हिरकण मोतीराम बच्छाव यांच्या स्मृती प्रित्यर्थ ५ लाख १०१ रुपयांचे दान दिले आहे. विश्वस्त संस्थेच्या मुख्यकार्यालयात हे दान देण्यात आले. यावेळी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते निकम कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रसंगी शकुंतला निकम, राजेंद्र निकम, मनोज निकम, सुषमा देवरे, वर्षा सोनवणे, मनिषा निकम, सुवर्णा निकम, दिलीप देवरे, उदय सोनवणे आदींसह विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, राजेंद्र पवार, शांताराम बर्डे, पद्माकर देशमुख, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !